प्रतिनिधी —
विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून अंतर्गत रस्सीखेच वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या असल्या, तरी जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवरील नेते या प्रश्नावर थेट भूमिका घेण्याचे टाळत असून अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वाकडे असल्याचे सांगत घोडदौड मुंबई आणि दिल्ली दरबारात सुरू असल्याने तर्क-वितर्कांना अधिकच उधाण आले आहे.
शिंदे शिवसेनेकडून तब्बल नऊ इच्छुकांची नावे चर्चेत असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. त्यात पूर्वेश सरनाईक, दृष्यंत चतुर्वेदी, किरण पांडव यांसारख्या बाहेरील नावांसह जिल्ह्यातील सलीम खेतानी यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य नावांमुळे स्थानिक स्तरावर अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची कुजबुज सुरू झाली आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्या किंवा बाहेरील चेहऱ्यांना संधी दिली जाणार का, असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या निवडणुकीत उमेदवार शिंदे शिवसेना गटाचाच असणार असल्याची माहिती पराग पिंगळे यांनी दिल्याचे समोर आले आहे.
दुसरीकडे भाजपमध्येही इच्छुकांची संख्या कमी नसल्याचे दिसत आहे. नगरसेवकांची संख्या आणि मतदारांमधील प्रभाव लक्षात घेता पक्षाची दावेदारी अधिक मजबूत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि काही प्रभावी व्यावसायिकांनीही उमेदवारीसाठी पक्ष पातळीवर फिल्डिंग सुरू अल्याची चर्चा आहे. काही इच्छुकांनी गुप्त बैठका, मतदारसंघ दौरे आणि कार्यकर्ता मेळाव्यांद्वारे वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे.
वरवर महायुतीमध्ये एकोप्याचे चित्र रंगवले जात असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र चढाओढ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक गटांकडून वरिष्ठ नेतृत्वासमोर स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी स्वतंत्र हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही प्रभावी नेत्यांनी आपल्या समर्थकांना संधी मिळावी यासाठी मुंबईत राजकीय फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे.
अंतिम निर्णय जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही इच्छुकांनी पर्यायी राजकीय पर्यायांचाही विचार सुरू केल्याची चर्चा असून, अपक्ष लढण्याची तयारी, इतर पक्षांशी संपर्क तसेच स्थानिक समीकरणांची जुळवाजुळव यांनाही वेग आल्याचे बोलले जात आहे.
महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार की राजकीय अस्वस्थता आणखी वाढणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



