अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ही जागा अधिकृतपणे भाजपच्या वाट्याला गेली असली तरी मित्रपक्षांमधील असंतोषामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा हिंगोली-परभणी विधान परिषद मतदारसंघाचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल करत राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
हिंगोली-परभणी विधान परिषद मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी विप्लव बाजोरिया प्रयत्नशील होते. मात्र पक्षाकडून संधी न मिळाल्याने त्यांनी अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उडी घेतली आहे.
या निवडणुकीत काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदीप देशमुख आणि भाजप-महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्यात थेट लढत अपेक्षित असताना बाजोरिया यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
दरम्यान, भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतील घटक पक्ष युवा स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आमदार रवी राणा यांची अनुपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. रवी राणा यांचा प्रवीण पोटे यांच्यावरील नाराजीचा सूर यापूर्वीही दिसून आला असून, त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष म्हणजे, जर रवी राणा यांनी विप्लव बाजोरिया यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला, तर या मतदारसंघातील निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे महायुतीचे वरिष्ठ नेते बाजोरिया यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात की ते शेवटपर्यंत अपक्ष उमेदवारी कायम ठेवतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती विधान परिषद निवडणुकीत निर्माण झालेल्या या नव्या राजकीय घडामोडींमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.